पुणे : क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एक कोटी 10 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आरोपी पसार झाला होता. अखेर सायबर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आले आहे.
वकिल संतोष पोपट थोरात (रा. खराडी, पुणे) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. आरोपी संतोष थोरात याने सोनिटिक्स नावाचे अभासी चलन तयार केले आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास 20 टक्के वार्षिक परतावा देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले आहे. गुंतवणुकीच्या अनेक पटीमध्ये परतावा मिळण्याच्या अपेक्षेने फिर्यादीसह तक्रारदारांकडून 1 कोटी 10 लाख रुपये गुंतवले होते. परंतु, आरोपीने कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी संतोष थोरात याने गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपुर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीने पोलिसांना कोणत्याही गोष्टींची माहिती मिळू नये यासाठी मोबाईल क्रमांक बदलला. राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलले. सायबर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरुन त्याचा मार्ग काढून त्याला बेड्या ठोकल्या. त्या आरोपीला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सोनिटिक्स नावाचे अभासी चलनामध्ये ज्या-ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात यावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आर.एन. राजे यांच्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, संदीप मुंढे, संदीप पवार, दिनेश मरकड यांच्या पथकाने केली.