इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात जगत्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज पालखीतील पहिले गोलरिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा पाहण्या साठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. लक्ष लक्ष नेत्रांनी लुटला हा आनंद सोहळा.
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा !!
शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची !!
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी !!
जन्मोजन्मी वारी घडली तया !!
‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषामध्ये हरिनामाचा गजर करत, हा सोहळा आनंद सोहळा होत होता. तुकोबारायांच्या पालखीने पहाटेच निमगाव केतकीतून प्रस्थान ठेवले होते. इंदापूरमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत पालखीचे स्वागत करण्यात आले. रिंगणस्थळी पालखी पोहचली. तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचे स्वागत केले. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली. नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची रिंगण पाहणी आणि त्यांनंतर भगवे पथकाचे झेंडेकरी, विणेकरी धावल्यानंतर हंडेकरी व तुळशीवाल्या भगिनी, पखवाजवाले धावले.
पोलिसांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला. सुरुवातीला मानाच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्हीही अश्वांच्या परिक्रमेने लक्ष लक्ष नयनांचे पारणे फेडले. इंदापूर परिसरातील हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रिंगण सोहळा पाहण्याकरीता मोठी गर्दी केली होती.
हे दृश्य हजारो उपस्थितांनी आपल्या नयनांनी अनुभवले. अश्वांच्या टापुची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी रिंगणाला लावलेल्या संरक्षक काट्यांमधून धावा घेत एकच गर्दी केली. अश्वाच्या टापुंची माती कपाळी लावल्यानंतर धन्य-धन्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यानंतर मुख्य पालखीला टाळकरी, वारकऱ्यांनी भजन करीत फुगडी, झिम्मा खेळत मानवी मनोरे उभारत व शेवटी उडी घेऊन या अंत्यत प्रभावशाली ऐतिहासिक रिंगण सोहळ्याची सांगता झाली.
वारकऱ्यांसह पोलिसांनी, नागरिकांनी फुगडी खेळून या सोहळ्याचा आनंद साजरा केला. या सोहळाचे पालखी सोहळा प्रमुखांनी सुत्रसंचलन केले यातच पावसाने विश्रांती घेतल्याने भविकांना या रिंगण सोहळ्याचा आनंद लुटता आला.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, प्रदीप गारटकर, नीलम सामंत, पोलीस उप अधीक्षक कोल्हापूर सुजितकुमार क्षीरसागर, प्रांत अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कोकणे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, भरत शहा, कैलास कदम, पोपट शिंदे, अनिकेत वाघ, स्वप्नील राऊत, श्रीधर बाब्रस यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.