पुणे : सध्या बालशोषणाच्या घटनांची मालिका वारंवार सुरु आहे. ज्यात जवळचे नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडूनच बालकांच्या लैंगिक शोषणाच्या घटना सद्यःस्थितीत घडत असताना दिसून येत आहे. या बाबत पालकांनी जागरुक राहून ‘गुड टच-बँड ट्च’ विषयी समुपदेशनासह सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर झी लर्न प्रस्तुत, किडझी प्री स्कुलच्या कस्पटे वस्ती, पिंपळे गुरव, चौधरी पार्क या शाखेकडून २१ सप्टेंबर रोजी ‘बाल लैंगिक अत्याचार विरोधी’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
लहान मुला-मुलींना अशा अत्याचाराची समज जर लहान वयातच आली आणि बाल लैंगिक शिक्षण जर शाळेतून तसेच घरामधून मिळाले, तर अशा अत्याचाराला विरोध करत मुलांनी त्याबद्दल आई-वडिल, पालक, शिक्षक इत्यादींसोबत अगदी मनमोकळेपणाने बोलू शकतील. त्यामुळे सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. तसेच अत्याचाराला आळा बसण्यासही मदत मिळेल. अशा प्रकारचा संदेश घेऊन बाल लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी झी लर्न प्रस्तुत, किड्झी शाळेने ‘बाल लैंगिक अत्याचार विरोधी’ रॅलीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्यध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
या रॅलीत बालशोषण अत्याचाराबाबत विविध संदेश, घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. समाजात बाल लैंगिक शोषणबाबत जनजागृती व्हावी आणि लहान मुला-मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, हा या रॅलीमागील उद्देश होता. ‘किड्झी’ शाळेच्या पिंपळेगुरव या शाखेने साई पार्क ते डायनासोअर गार्डनपर्यंत, तर कस्पटे वस्ती या शाखेने किड्झी कस्पटे वस्ती ते पिंक स्टिटी रोड वाकड, तसेच चौधरी पार्क या शाखेने किड्झी चौधरी पार्क ते पिंक मिरी रोड वाकडपर्यंत रॅली काढली.
सध्या सुरु असणाऱ्या बालशोषणाबाबत शाळा ‘गुड टच, बॅड टच’ सारखे उपक्रम राबवत असते. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर साळुंखे म्हणाले की, आमच्या ‘किड्झी’ शाळेत मुलांना एका कटुंबाप्रमाणेच सुरक्षित वातावरण मिळते. तसेच आजपर्यंत अशी कोणतीही घटना शाळेत घडली नाही आणि घडणारही नाही. कारण आमच्या बालकांमध्ये बालशोषणाविषयी जागरुकता व्हावी म्हणून लहान वयातच विविध उपक्रमांद्वारे माहिती दिली जाते. ज्यामुळे मुले-मुली आणि शिक्षक यांच्यात सुरक्षिततेचे नाते निर्माण झाले आहे.
लैंगिक शोषणापासून सुरक्षित राहण्यासाठी कौशल्य शिकवणे, ‘स्वसंरक्षण’सारखे उपक्रम घेणे, ही पालकांबरोबर शाळेचीसुद्धा जबाबदारी आहे. याची जाणीव आम्हाला आहे. ती जाणीव जनसमुदायापर्यंत पोहचवावी, त्यासाठी ‘बाल लैंगिक शोषण’ थांबवण्यासाठी समाजाचा एक भाग व एक नागरिक म्हणून या रॅलीचे आयोजन केले होते, असं शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे यांनी सांगितले.