लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन चौकाजवळ रविवारी (ता. 24) रात्री एक रिक्षा व एक दुचाकीचा अपघात झाला. या अपघातानंतर वाहतूक कोंडी आणि वाद मिटवण्यासाठी गेलेल्या हडपसर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे.

‘आपण कधीतरी 12 तास उन्हातान्हात उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिसांच्या बाजूनेही विचार करायला हवा,’ अशी भावना आता सजग नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, या व्हिडिओमागचे संपूर्ण सत्य आणि त्यावेळची वस्तुस्थिती समोर आली असून पोलिसांच्या बाजूनेही विचार करायला हवा,’ अशी भावना आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन चौकाजवळील मारुती मंदिराजवळ एक रिक्षा व दुचाकींचा अपघात झाला. त्यावेळी लोणी स्टेशन चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य बजावणारे पोलीस हवालदार अनिल गायकवाड हे अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजूला घेऊन वाहतूक कोंडी फोडली आणि दोन्ही चालकांना वाद वाढवण्याऐवजी “तुमच्यातली तुम्ही सामोपचाराने भांडण मिटवून घ्या,” असा सुजाण सल्ला दिला.
पाहा व्हिडीओ:
परंतु, अपघातातील रिक्षा चालकाने पोलीस हवालदार गायकवाड यांना उलट सुलट उत्तरे देत, “तुमचा याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही निघून जा,” अशी अरेरावी केली. इतकेच नव्हे तर, झालेल्या किरकोळ नुकसानीसाठी त्या रिक्षा चालकाने चक्क 3 हजार रुपयांची अवाजवी मागणी लावून धरली.
दरम्यान, अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ लागली. अनिल गायकवाड यांनी गर्दी पांगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र गर्दी हटायला तयार नव्हती. शेवटी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी पांगवण्यासाठी अनिल गायकवाड यांना नाईलाजाने कठोर होऊन ‘पोलिसिंग’ (खाकीचा धाक) दाखवावा लागला.
पोलीस हवालदार गायकवाड हे त्या रिक्षा चालकाला, त्या दुचाकीवरील व्यक्तीला आधी अत्यंत शांतपणे व समजुतीने सांगत होते. मात्र, जाणीवपूर्वक तो चांगल्या वर्तनाचा व्हिडिओ न काढता, केवळ गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या कठोर भूमिकेचा तेवढाच भाग काही जणांनी मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांची जनमानसातील प्रतिमा डागाळण्यासाठीच हा अर्धवट आणि खोटा व्हिडिओ पसरवण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पोलीस हवालदार अनिल गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर आणि हडपसर वाहतूक विभागात अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. आपल्या उत्कृष्ट कार्यपद्धतीने त्यांनी नेहमीच आपल्या कामाचा ठसा जपला आहे. एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून संपूर्ण परिसरात त्यांची मोठी पत आहे.
दरम्यान, कालच्या घटनेत हवालदार गायकवाड यांचा कोणताही गैरहेतू नव्हता. केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आवाजवी मागणी करणाऱ्या रिक्षा चालकाला व दुचाकीस्वाराला शिस्त लावण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती, अशा शब्दांत लोणी काळभोरमधील नागरिकांनी अनिल गायकवाड यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला आहे.







