संदीप टुले
केडगाव(पुणे) : गावाला समस्येच्या गर्तेतून मुक्त करून, गावचा कायापालट मीच करेन, असं सरपंचपदासाठी उभा असणारा प्रत्येक उमेदवार ग्रामस्थांना आश्वासन दाखवतो अन् तोच मतदार राजा या आमिषाला बळी पडतो. मतदार त्या उमेदवाराच्या पारड्यात आपलं मत टाकतो. पण एकदा का गावचा कारभार आपल्या हातात आला की तो रुबाब दाखवायला लागतो. पण दौंड तालुक्यातील केडगावचे नवनिर्वाचित सरपंच व त्यांचे पॅनल प्रमुख व सहकारी त्याला अपवाद ठरतात.
गेल्या अनेक दिवसांपासून केडगाव पेठेला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालागत असलेला ओढ्यात कचरा व घाणीचे मोठ्या प्रमाणात पुलालागत साठली होती. त्यामुळे ओढ्यातील सर्व पाणी येथेच तुंबून राहिले होते. त्यामुळे घाण वासही सुटला होता. कोणत्याही गाव पुढाऱ्यांचे याकडे लक्ष गेले नाही, नागरिकांनी अनेक वेळा तक्रारही केली होती. पण काही झाले नाही. मागील आठवड्यात निवडून आलेले सरपंच बारवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन काम करण्यास सुरुवात केली.
सरपंच बारवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ओढ्यातील साठलेला कचरा व घाण जेसीबीच्या साह्याने स्वतः तिथे उभे राहून साफ करून घेतली. या पाण्याचा प्रवाह सुरळीत केला. तसेच मागील दोन दिवसांपूर्वी नवनिर्वाचित सरपंच यांच्या पतीने घन कचऱ्यासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टर खूप दिवसांपासून कोपऱ्यात बंद पडला होता. त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते, पण त्यांनी तो ट्रॅक्टर स्वतः चालून बाहेर काढला. दुरुस्तीसाठी पाठवून दिला व नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात सुरुवात केली. नागरिकांच्या कौलचा मान राखत कामाला जोरदार सुरुवात केली.