दौंड(पुणे) : दौंड तालुक्यातील अतिमहत्वाची ग्रामपंचायत म्हणून केडगाव ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते. पण नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये केडगाव विकास आघाडीच्या पूनम गौरव बारवकर यांची मोठ्या मताधिक्याने सरपंचपदी जनतेतून निवड झाली.
या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाल्याने कोणत्याच गटाला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे उपसरपंचपदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. निवडून आलेल्या सदस्यामध्ये महेश म्हेत्रे, प्रशांत शेळके, प्रियांका मोरे, अशोक हंडाळ, दत्तात्रय शेळके, पल्लवी बारवकर, भाऊसाहेब शेलार, पुष्पावती हंडाळ, नितीन जगताप, रेखा राऊत, तेजस्विनी गायकवाड, संदीप राऊत, शैला पितळे, सारिका भोसले, कुसुम गजमल, निलेश कुंभार, लता गायकवाड अशा एकूण 17 सदस्यांचा समावेश आहे.
यामध्ये कुल गटातील सदस्यांची संख्या 8 असून, ‘केडगाव विकास आघाडी’च्या सदस्यांची संख्या 5 तर थोरात गटाच्या सदस्यांची संख्या 3 आणि अपक्ष 1 अशी आहे. त्यामुळे कोणत्याही एका गटाची मदत घेतल्याशिवाय कोणत्याच गटाचे उपसरपंचपदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही.
त्यामुळे येत्या 23 तारखेला उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. येत्या 23 तारखेला याच सदस्यांमधून उपसरपंच निवडला जाणार असल्यामुळे गावपातळीवरील एका गटाने त्यांचाच उपसरपंच करण्यासाठी गटातील सदस्यांना अज्ञातस्थळी हलविल्याची चर्चा आहे.
अपक्ष निवडून आलेले उमेदवार ठरवणार केडगावचा उपसरपंच
केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रशांत शेळके यांनी अपक्ष निवडणूक लढवत दोन्ही गटांना धोबीपछाड देत बाजी मारली होती. आता उपसरपंचपदासाठी त्यांना आपल्या गटाकडे वळवण्यासाठी तिन्ही गटाकडून त्यांची मनधरणी चालू असल्याची चर्चा आहे. संभाव्य उपसरपंचाच्या यादीमध्ये अपक्ष प्रशांत शेळके आणि दत्तात्रय शेळके यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे.