केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव ही मोठी बाजारपेठ आहे. लाखोंची उलाढाल ही एकट्या बाजार दिवशी होते. कारण 8 ते 10 गावांचा थेट संपर्क या बाजारपेठेशी आहे. त्यामुळे येथे नागरिकांची नेहमीच गर्दी असते. पण पावसाळा आला की या बाजापेठेतील बाजार मैदानाचे दृश्य पाहून येथे एवढी मोठी कशी उलाढाल होत असेल हा प्रश्न नक्कीच पडतो.
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून केडगाव बाजार पेठेची ओळख असणाऱ्या या बाजारपेठेची पावसाळ्यातील घाणीचे साम्राज्य असलेली आठवडे बाजार म्हणून ओळख व्हायला वेळ लागणार नाही, असे दृश्य येथे तयार होत आहे. ग्राहकांना येथे काही खरेदी करावे की नाही असा प्रश्न पडत असेल.
तसेच इतर स्वच्छतेबाबत ही दुर्लक्ष होत असल्याने येथे कायमच घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. तसेच येथेच स्वच्छतागृह असल्यामुळे परिसरात कायमच घाण वासाचे साम्राज्य असते. त्यातच अधून-मधून पावसाच्या पाण्याचे डबकी साचत असल्याने येथील लोकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. पण केडगाव ग्रामपंचायत याबाबत गांभीर्याने लक्ष घालणार का? आणि या परिसरातील घाण दूर होणार का? याची येथील रहिवासी नक्कीच वाट पाहत असणार.
यावेळी भाजीपाला विक्रेते काका काळे म्हणाले, बाजारात माल घेऊन येणाऱ्याकडून आणि विकणाऱ्याकडून ग्रामपंचायत पट्टया घेते मग त्यांना सुविधा देणे हे ग्रामपंचायतचे काम आहे. पावसाळा सुरू होत आहे हे लहान मुलांनाही माहीत होत पण ग्रामपंचायतला कसं समजत नाही. की प्रत्येक पावसाळ्यात बाजार मैदानात चिखल होतो. येथे मुरूम तरी टाकने गरजेचे आहे.
याबरोबर केडगाव ग्रामपंचायत उपसरपंच प्रशांत शेळके म्हणाले, दर वर्षी मुरूम टाकला जातो पण या वर्षी पाऊस हा अवकाळी पडल्यामुळे बाजार मैदानात पाणी साठले. तसेच बाजार मैदानातून मिळणारा करही खूप कमी प्रमाणात मिळत असल्यामुळे लोकसभेची आचासंहिता संपली की कर वसुली मिळकतीचा लिलाव करणार आहोत. ही प्रोसेस झाली की थोड्याच दिवसात बाजार मैदान चकाचक करणार आहेत.
यावेळी दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिलीप हंडाळ म्हणाले, 2009 ला ग्रामपंचायत ने त्यावेळचे विद्यमान आमदार रमेश थोरात यांच्याकडे काँक्रिटचा प्रस्ताव सादर केला होता, पण त्यानंतर ग्रामपंचायत स्तरातून पुढे काहीच हालचाली न झाल्यामुळे तो प्रस्ताव रेंगाळत पडला पण आता विद्यमान आमदार आणि माजी आमदार हे दोन्हीं तसेच महायुतीच्या सरकारमध्ये असल्यामुळे आगामी काळात हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु करणार आहोत.