Jitendra Awhad, मुंबई : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना चांगलाच लक्ष्य केलं आहे. शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच, असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. दमदाटी करणं हा अजितदादांचा स्वभाव दोष असून प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. तसेच अजित पवार मोठे नेते, ते कुणालाही पाडू शकतात, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले दमदाटी करणे हा अजितदादांचा स्वभाव दोष आहे. मी शरद पवारांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो, हे गप्प बस, उठू नकोस…असं चालत नाही. तुम्ही घरी नाही, सार्वजनिक जीवनात आहे. प्रत्येकाला हृदयात मानसन्मान असतो. टीव्ही चालू असताना मला म्हणाले, ये गप रे…माझी मुलगी, पत्नी, नातेवाईक बघत असतील तर काय या जितेंद्रची इज्जत आहे. असा प्रश्न निर्माण होतो. मी त्यांच्यापासून लांबच राहायचो.
ती मोठी माणसं, कुणालाही पाडू शकतात
आव्हाड म्हणाले, तुला पाडून दाखवतो असं जमत नाही. ती मोठी माणसं आहेत, कुणालाही पाडू शकतात, ४८ च्या ४८ जागा निवडून आणू शकतात. विरोधकांना काय खुपतं आणि ते भाजपासोबत गेले हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. दुसऱ्याचे मन ओळखता येत नाही. मी भविष्यकर्ता नाही. प्रत्येकाला घाबरवणे हे कोणालाही शक्य होत नाही. या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही. तो कधी ना कधी येणारच आहे ना. जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना का घाबरायचे? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा प्रयत्न
तर निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या निर्णयाविषयी बोलणं चुकीचे आहे. सुनावणीवेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आमच्या निकालावर भाकीत वर्तवू नका असं बजावलं होतं. परंतु सुनील तटकरे हे घड्याळ चिन्ह आम्हालाच मिळणार असं विधान करतायेत. निवडणूक आयोगाचा निर्णय कधीही येऊ शकतो अशावेळी हे विधान केले जात आहे. त्यातून एकप्रकारे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा ते प्रयत्न करतायेत असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा गटावर आरोप केला आहे.
प्रभू श्रीराम हे भाजपाचा ३ महिन्यातील बाजारच
सोबतच लढायचं तर कमळावरच..भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाला घरचा रस्ता दाखवतील. वेळ आल्यावर सगळे समोर येईल असंही आव्हाडांनी म्हटलं. प्रभू श्रीरामाचा निवडणुकीसाठी वापर प्रभू श्रीराम हे भाजपाचा निवडणुकीच्या ३ महिन्यातील बाजारच असतो. धार्मिक बाजार मांडून देशाचे वातावरण खराब करायचं आणि निवडणूक लढायची हे भाजपाचे धोरण आजचे नाही तर वर्षोनुवर्षाचे आहे. आजच्या तरुणपिढीला हे चालत नाही. बाहेरच्या देशातील परिस्थिती बघून आपल्या देशात काय सुरू आहे हा प्रश्न त्यांना पडतो अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर आरोप केले आहेत.