लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गाचे तीन-तेरा वाजले असतानाच कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील लोणी स्टेशन परिसरात सोलापूरच्या बाजूने जाणारा सेवा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोद्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंधाराचा फायदा घेत अज्ञातांनी दोन दिवसांपूर्वी सुमारे 500 मीटर रस्ता खोदला आहे. हा रस्ता कोणी खोदला?, कोणी परवानगी दिली? याची माहिती अद्याप मिळू शकली नसून रस्ता खोदल्याने लोणी स्टेशन चौकातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गाचा सेवा रस्ता खोदून झाल्यानंतर त्याच्यावर ओबडधोबड माती ढकलण्याचे काम संबंधित व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने केले आहे. त्यामुळे रस्त्याचे नुकसान झाले असून दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडत आहेत. खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असल्याने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी व रस्ता खोदणाऱ्या संबंधितावर कारवाई कारवाई करण्याची मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.
लोणी स्टेशन चौकात कायम दुचाकीसह चारचाकी, पीएमपीएमएल, तीन चाकी रिक्षा आदी वाहनांची वर्दळ असते. तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणारा एकमेव रस्ता व मोठे हॉस्पिटल असल्याने या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. सेवा रस्त्यावर चारी खोदून त्यावर मलमपट्टी लावण्याचे काम संबंधित व्यक्तीने व जेसीबीचालकाने केले आहे. त्यामुळे रस्त्याची अक्षरक्षा: वाट लागली आहे. यामुळे सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहन चालक व वाटसरू यांना नाहक त्रास होत आहे.
या रस्त्याची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झाली असून केवळ मलमपट्टी करण्यात आली. मात्र, या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे कमी होण्याऐवजी वाढत आहेत. हा रस्ता खोदण्यासाठी कोणाची परवानगी घेतली आहे का? जर घेतली असेल तर संध्याकाळी हा रस्ता का खोदला गेला? याबाबत चौकशी करून संबंधित रस्ता खोदणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
दरम्यान, मुख्य रस्त्यासाठी केलेल्या खोदाईमुळे नागरिक, वाहनधारकांची कसरत सुरू आहे. रस्त्यांची तोडफोड करणारा मात्र रस्ता आपल्या मालकीचा समजून मनमानी करीत असल्याचा आरोप हि नागरिकांनी केला आहे. तर याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुण्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता पंकज प्रसाद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.