बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राजुरा धरण परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अत्यंत घाईने आणि निष्काळजीपणाने तपास केला. कोणतीही अधिकृत ओळख पटलेली नसताना, पोलिसांनी तो मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या मुलीचा असल्याचा दावा केला. या चुकीच्या निष्कर्षापोटी शिवानी जिवंत असतानाही, तिच्या निष्पाप वडिलांना आणि भावाला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

दरम्यान, तपासात मोठा बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अमरावती पोलीस आयुक्तांनी घेतलेला हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

पीडित बाप-लेकाने पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले कि, डीएनए अहवाल येण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी बेदम मारहाण केली आणि दबाव टाकला. या घटनेमुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर मोठा डाग लागला आहे.

प्रकरण पाहता, राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते स्वतः जळगाव जामोदला भेट देणार आहेत. ते बुलढाणा पोलीस दलाची उच्चस्तरीय बैठक घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करतील. निष्पाप नागरिकांना चुकीच्या तपासात अटक केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून पोलीस दलाची कडक झाडाझडती घेण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी काय बाबी समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







