उरुळी कांचन, (पुणे) : नाशिक येथे झालेल्या मास्टर्स गेम्स मैदानी स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी ३ सुवर्णपदकास गवसणी घातली आहे. महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स ४ थी क्रीडा स्पर्धा २०२३ नाशिकच्या मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर १७ आणि १८ डिसेंबर २०२३ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये इनोसन्ट टाईम्स स्कूल पुणे – क्रीडा शिक्षक, आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय लक्ष्मण मदने यांनी सहभाग घेतला होता. यावेळी स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय खेळाडू महेंद्र बाजारे, मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते सुवर्ण पदक विजेते धनंजय मदने यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत धनंजय लक्ष्मण मदने यांनी ११० मीटर हार्डल्स, ३००० मीटर स्टीफलचेस व उंच उडी, या तीन स्पर्धेत ३ सुवर्णपदके पटकावली आहेत. आणि या क्रीडाप्रकारातील यशाचे सातत्य कायम ठेवले आहे. तसेच पुणे जिल्हा संघाचे कर्णधार धनंजय मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा संघास अजिंक्यपद प्राप्त झाले आहे.
दरम्यान, गोवा येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये त्यांची निवड झाली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ॲड. अशोक पवार आणि इनोसन्ट टाईम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष अंकिता संघवी यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.