शिरवळ : बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले नरसिंग राठोड यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण लागले आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलासह सहा जणांवर विमा कंपनीची कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करत शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणानुसार, दि. 29 एप्रिल 2023 रोजी नरसिंग राठोड हे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. मात्र, विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामध्ये मयतांचे मुलगे अक्षय राठोड, पत्नी उषा राठोड, दत्तात्रय शेटे, प्रकाश उर्फ बंटी येलगुडे, प्राजक्ता येलगुडे आणि स्वप्नील शिंदे यांचा समावेश आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तोंडल ता. खंडाळा गावच्या हद्दीमध्ये दि.29 एप्रिल 2023 रोजी नरसिंग दौलत राठोड (वय 55, रा. भोर जि. पुणे) हे दुचाकी (क्रं-एमएच-12-एसआर-3795) लोणंद ते शिरवळ असे दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती असतानाही विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचत व पोलीसांना खोटी खबर देत मयत नरसिंग राठोड यांचा मुलगा अक्षय राठोड (वय 26), पत्नी उषा नरसिंग राठोड (वय 51, दोघे रा. भोर जि. पुणे), दत्तात्रय शंकर शेटे (वय रा. भोर जि. पुणे), दत्तात्रय शंकर शेटे (वय 25, रा. उत्रोली जि. पुणे) प्रकाश उर्फ बंटी दिगंबर येलगुडे (वय 23) प्राजक्ता दिगंबर येलगुडे (वय 23) दोघे रा. नवी आळी, भोर जि. पुणे) स्वप्नील सुनील शिंदे (वय 24, रा. नसरापूर ता. भोर जि. पुणे) यांनी जाणीवपुर्वक व खोटी खबर दिली.
याप्रकरणी लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसान पोहोचेल अश्याप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने तसेच अप्रमाणिकपणे व हेतुपरस्पर खोट्या माहितीमुळे खोट्या गुन्ह्यात न्यायालयात तब्बल 1 कोटी 19 लाख 29 हजार 600 रुपयांचा विमा भरपाई दावा करून विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय राठोड, उषा राठोड, दत्तात्रय शेटे, प्रकाश उर्फ बंटी येलगुडे, प्राजक्ता येलगुडे, स्वप्नील शिंदे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी खोटा गुन्हा दाखल करून विमा कंपनीकडून एक कोटी १९ लाख रुपयांची भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विमा कंपनीच्या प्रतिनिधींना याबाबत संशय आल्याने त्यांनी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.