इंदापूर : पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे यांना आदर्श आचारसहिंता लागू झाल्यापासून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकांनी तिघांवर कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण यांना गोपनीय बातमी मिळाल्यावरुन पळसदेव येथील निखील उर्फ लाला गणपत शिंदे यांने तलवार हातात घेवून फोटो काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरुन सापळा रचुन त्यास पकडून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर इंदापुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याचा तपास सहा पोलीस फौजदार प्रकाश माने हे करीत आहेत.
दुसरी घटना अशी की, दि.१५ रोजी इंदापूर येथील राजे ज्वेलर्स यांच्या दुकानात सोने खरेदी करण्याचा बहाणा करुन हात चलाखीने दोन वेळा सोने चोरी करणारा सराईत चोरटा विठ्ठल रामचंद्र सानप (रा. संभाजीनगर) यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडून चोरलेला मुद्दमाल सोन्याची अंगठी व डोर्ले असा ३६ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तहसिलदार इंदापूर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग बाबूराव देवकर (रा. बेडसिंग, ता. इंदापूर, जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, विशाल चौधर, तुषार चव्हाण, अंकुश माने, नंदु जाधव, प्रविण शिंगाडे यांनी केली आहे.