आदित्य बोराटे

इंदापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू (Indapur News) सुलतानाशी करणारे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेताल वक्तव्याचा इंदापुरात सकल हिंदू समाजाच्या (Harshwardhan Sapkal) वतीने जाहीर निषेध करून त्यांच्या फोटोची प्रतिमा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
इंदापूर नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाजाकडून पुष्पहार अर्पण करून शहरातील पंचायत समिती समोरील जुना पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हे निषेध आंदोलन पार पडले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद अशा विविध घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
या वेळी दीपक अण्णा काटे, अँड.आकाश कांबळे,माऊली चवरे, राजकुमार जठार,ॲड.मयूर शिंदे, राम आसबे, उदय देशपांडे, किरण गानबोटे,महेश बोधले,सागर गोसावी,नितीन देवकर,आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दीपक काटे म्हणाले,आमच्या दैवताचा जो अपमान हर्षवर्धन सपकाळांनी केला, त्याबद्दल आम्ही इंदापूर सकल हिंदू समाज व भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करत आहोत. हिंदूंची सरेआम कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे.औरंगजेबाच्या समाधीचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. त्यामुळे अशा या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने त्वरित राजीनामा द्यावा.यावेळी आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.







