पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एका व्यक्तीशी भांडत असलेला व्हिडिओ आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे एका व्यक्तीला शिवीगाळ करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
“तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल”, तुझी लायकी काय, हरामखोर अशा अर्वाच शब्दात आमदार भरणे यांनी समोरच्या व्यक्तीला खडेबोल सुनावले आहे. या सर्व प्रकारचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मिडिया हँडलवर पोस्ट केला आहे.
रोहित पवारांची काय आहे पोस्ट?
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
दत्ता भरणे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दोघांमधील भांडणे सोडवत होतो. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, व्हिडिओ पाहून ते भांडण सोडवत होते असं वाटत नाही. ते समोरच्या व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत. एकाच व्यक्तीला ते बोलत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कोण भांडण सोडवतं? असं रोहित पवार म्हणाले आहेत.