पळसदेव(पुणे): पुणे – सोलापूर महामार्गावरील इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड यांनी दिली. रस्ता वाहतुकीच्या नियमांची व सुरक्षेविषयक जनजागृती करून रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत पुणे सोलापूर महामार्गालगत अधिकृत एसटी बस थांबा असलेल्या ढाब्यांवर व हॉटेलांवर वाहतुकीचे नियम असलेले फलक लावण्यात आले आहेत. प्रवाशी व नागरिकांमध्ये फ्लेक्स बोर्ड लावून सुरक्षित प्रवास, घ्यावयाची काळजी, वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती केली जात आहे. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सरडेवाडी (इंदापूर टोल प्लाझा ) येथे वाहनचालकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याशिवाय एस टी बसस्थानक, शाळा महाविद्यालये शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थी -पालकांसाठी प्रबोधन शिबीराचे आयोजन, चित्रकला निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे . तसेच एमआयडीसी साखर कारखान्यामधील कामगार, प्रवाशी या नागरिक यांच्यामध्ये वाहतुक जनजागृती करणे , ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवणे आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कुरेवाड यांनी दिली .