इंदापूर : महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना महाविद्यालयात करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन २० सप्टेंबर २०२४ रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणाली द्वारे विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी पियाजिओ प्रायव्हेट लिमिटेड बारामती, मानव संसाधन व प्रशासक विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष किरणकुमार चौधरी तसेच त्यांचे सहयोगी चंद्रकांत काळे साहेब हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
ऑटोमोबाईल विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र विषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून या महाविद्यालयाचे निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या केंद्राद्वारे किमान कौशल्य वर आधारित प्रशिक्षण दिले जाईल असे यावेळी त्यांनी नमूद केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणी करिता तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविणे या हेतूने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक युवतींना विविध 37 क्षेत्रामध्ये (बँकिंग ,माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल, वित्त इत्यादी )कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवून रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यवसाय कौशल्य, विकास कौशल्यवर्धन, पुनर कौशल्य विकास करण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न होण्याकरिता तांत्रिक ज्ञानाबरोबरच सॉफ्ट स्किल आत्मसात केले पाहिजे. या केंद्रामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल हे प्रशिक्षण उद्योग व्यवसायाशी निगडित असून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. असे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी किरणकुमार चौधरी यांनी उद्योग व्यवसायाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे सध्याच्या युगात वेल्डिंग तंत्रज्ञान, पेंट तंत्रज्ञान यासारख्या गोष्टीं शिकण्यावर भर दिला पाहिजे. असेंबली विभागात विशेष प्राविण्य असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
बारामती शहरातील पियाजिओ कंपनीत विशेष करून मुलींना प्राधान्याने रोजगार दिला जातो असे प्रामुख्याने त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. प्राध्यापक योगेश जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.