सागर जगदाळे
भिगवण : विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, बिल्ट, भिगवण येथे जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत. यामधील पाककला स्पर्धेत भिगवण परिसरातील अनेक सुगरण महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपली उपस्थिती नोंदवली. ‘मी अन्नपूर्णा’ या पाककला स्पर्धेसाठी तृणधान्यांपासून बनवलेली एक गोड व एक तिखट पाककृती हा विषय होता. या स्पर्धेत स्पर्धकांनी ज्वारी, बाजरी, नाचणी, कडधान्ये व डाळी यांचा वापर करून वेगवेगळ्या राज्यांमधील अनेकविध पाककृती सादर केल्या. या सादर केलेल्या लज्जतदार पाककृतींनी परीक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले. स्पर्धेला हॉटेल श्री व्हेजचे मुख्य शेफ हे परीक्षक म्हणून लाभले.
संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग भिगवणचे मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांनी तृणधान्यांचे आहारातील महत्त्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून पटवून दिले. यावेळेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून तृणधान्याचे महत्त्व असलेल्या म्हणींचा वापर करून व घोषणा देऊन जनजागृती केली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंदाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.