लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील शिक्षक सुलतान उर्फ सलाहुद्दीन कुरेशी शेख यांना एमजी पटेल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोणी काळभोर गावाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना दरवर्षी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील प्रतिष्ठित स्पोर्ट्स अँड एज्युकेशन असोसिएशन यांच्यातर्फे एमजी पटेल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी एका निवड समितीची नेमणूक करण्यात येते. निवड समिती शिक्षकांचे अध्यापन क्षेत्र, सामाजिक कार्य, साहित्यिक कार्य, विविध स्पर्धांमधील यश अशा उल्लेखनीय कामांचे मूल्यमापन करते. आणि पारदर्शकपणे देशभरातील शिक्षकांची एमजी पटेल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारा निवड करते.
पुणे जिल्ह्यातील कार्यक्षम पदवीधर शिक्षक म्हणून सलाहुद्दीन शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच त्यांची १५ उर्दू भाषेतील पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. सलाहुद्दीन शेख यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना सन २०२४ च्या एमजी पटेल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराचा सोहळा जयसिंगपूर येथे 14 सप्टेंबरला पार पडणार आहे. या सोहळ्यात सलाहुद्दीन शेख यांना खासदार छत्रपती शाहू महाराज द्वितीय व महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य हसन मुश्रीफ यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती शानदार स्पोर्ट्स अँड एज्युकेशन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अख्तर हुसेन पटेल यांनी दिली
दरम्यान, उर्दू शाळेतील शिक्षक सलाहुद्दीन शेख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होताच, कुंजीरवाडीचे शिक्षण विस्तार अधिकारी शब्बीर शेख यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.