लोणी काळभोर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता.२९) संपली आहे. शिरूर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघातही निवडणूकीची लढत जोरदार पाहायला मिळणार आहे. बहुचर्चित असलेल्या याच मतदारसंघात अशोक पवार नाव असलेले तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या मतदार संघात भाजपचे प्रदीप कंद आणि संजय पाचंगे व राष्ट्रवादीचे शांताराम कटके यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर राष्ट्रवादी कडून ज्ञानेश्वर कटके व राष्ट्रवादी (शरद पवार) कडून अशोक पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुकले आहेत.
दरम्यान, याच मतदार संघात एकच नाव असलेल्या तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ते म्हणजे अशोक रावसाहेब पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर अशोक गणपत पवार, अशोक रामचंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या तीनही एकच नावे असल्याने याचा फटका कोणाला बसणार? तर याचा फायदा कोणाला होणारा हेही पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.