बापू मुळीक
सासवड(पुणे) : गुंतवणूक केलेली रक्कम दहा महिन्यात दुप्पट करून देण्याचे तसेच दर आठवड्याला प्रोत्साहनपर रक्कम देण्याची बतावणी करून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सासवड (ता. पुरंदर) येथे घडला आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण अशोक शिंदे (रा. शिंदेवाडी ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सचिन दिगंबर लोळे( रा. सासवड तालुका पुरंदर )यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे आणि फिर्यादी सचिन लोळे यांच्यासह काही नागरिकांना मुंबई येथील सोने वाहतूक कंपनीमध्ये रोख व सोने यांची गुंतवणूक केल्यास दाम दुप्पट रक्कम तसेच प्रोत्साहनपर रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यास बळी पडून लोळेसह काहींनी सुरुवातीला काही रक्कम गुंतवण्यासाठी दिली.
त्यानंतर शिंदेने त्यांना दुप्पट पैसे परत सुद्धा दिले. मात्र पुढे गुंतवणूकदारांची संख्या वाढू लागली आणि त्यांनी शिंदेला एकूण 61 लाख 57 हजार 368 रुपये दिले. यावेळी शिंदेने गुंतवणूकदारांना बोगस धनादेश दिले. कालांतराने गुंतवणूकदारांनी पैसे परत मागितले, असता शिंदे पैसे देण्यात टाळाटाळ करू लागला. त्यानंतर तो पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलीस तपासात फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राणी राणे तपास करत आहेत.