भोर : राज्यभर सद्या गणेशोत्सवाचा आनंद साजरा होताना दिसत आहे. तसेच भोर शहारातही मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या दरम्यान शांततापूर्ण वातावरण टिकून राहावं त्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा जोरदार कामाला लागले आहेत. त्यासाठी भोर पोलिसांनी शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी अवैध दारू विक्री करणे आणि मारामारीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले आहेत. त्यांच्यामुळे शहरात अनेकदा वादविवाद आणि तणाव निर्माण होत होता. यामुळे गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची अशांतता निर्माण होऊ नये याची दक्षता ठेवण्यासाठी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे सासवड पुणे ग्रामीण यांच्या आदेशानुसार, भोर पोलीस स्टेशनने या ११ जणांना नोटीस बजावली असून यामध्ये अविनाश राजेंद्र लोणकर, प्रकाश किसन नवघणे, दत्तात्रय शंकर शेटे, लक्ष्मण राजाराम दळवी, सनी सुरेश बारगळे, गणेश ज्ञानोबा कंक, अमित प्रकाशसिंग तारू, सागर दशरथ धोंडे, हनुमंत सोपान मळेकर, कुणाल कुमार धुमाळ आणि मंगेश शंकर ओतारी यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचा कायदा भंग करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल. या निर्णयामुळे शहरात गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडेल याची खात्री आहे.