डाळिंब, पुणे : दौंड तालुक्यातील डाळिंब गावात भीमाशंकर धोंडीबा खंडागळे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास यवत पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला आहे. या प्रकरणात विजय सुभाष लेचरूड (वय 40, रा. डाळिंब) याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून भीमाशंकर यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाची सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी झाली. भीमाशंकर यांच्या आई नंदा खंडागळे (वय 51) यांनी मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.

दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी डाळिंब गावातील रमेश म्हस्के यांच्या विहिरीत भीमाशंकर यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांनी तपासाची दिशा बदलून खुनाच्या अनुषंगाने चौकशी सुरू केली.

हात-पाय दगडाला बांधून मृतदेह विहिरीत टाकला
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतदेहाचे हात-पाय लोखंडी तारेच्या साहाय्याने मोठ्या दगडाला बांधून विहिरीत टाकण्यात आले होते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
15 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संशयित विजय लेचरूड याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी भीमाशंकर यांनी शिवीगाळ केल्याच्या रागातून त्यांचा गळा दाबल्याचे आणि त्यानंतर मृतदेह विहिरीत टाकल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली. या पथकाला पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांचे मार्गदर्शन लाभले.
या तपास मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, तसेच पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, अक्षय मोरे, दशरथ नंदीवाले आणि ज्ञानेश्वर राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यांच्यासोबत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासो थिकोळे, सचिन घाडगे, आसिफ शेख, गुरुनाथ गायकवाड, सुभाष राऊत, विकास कापरे, संदीप देवकर, सुहास देवकाते, मारुती बाराते, प्रतीक जगताप, धीरज जाधव, सचिन गुंड, प्रतीक गरूड, विनीत कुर्हाडे आणि दिनेश लोणकर यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कामगिरी पार पाडली.






