नांदेड : जिल्ह्यातील माहूर घाटात झालेल्या अपघातात तीन भाविकांचा दुर्दैवी अंत झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. माहूर येथील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत जात असताना भाविकांच्या टेम्पोला किरोळी घाटात हा अपघात झाला. सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या घटनेमुळे यवतमाळ आणि माहूर भागात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथील नागरिक रेणुका देवीच्या दर्शनासाठी माहूर येथे आले होते. दर्शन पूर्ण झाल्यानंतर सर्व भाविक टेम्पोने आपल्या गावाकडे परतत होते. पहाटे 5:00 वाजताच्या सुमारास किरोळी घाटातील एका धोकादायक नागमोडी वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगातील टेम्पो थेट खोल दरीत कोसळला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी लगेचच मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासनालाही या अपघाताबाबत कळवण्यात आले. पोलिसांनी क्रेन आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने तातडीने बचाव मोहीम हाती घेतली. दरीत अडकलेल्या जखमींना आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात आले.

या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना त्वरित उपचारासाठी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या वैद्यकीय पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.






