पुणे: सायबर गुन्हेगारांनी पोलिस आणि तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. पुण्यातील बावधन परिसरात राहणाऱ्या 76 वर्षीय ज्येष्ठ महिलेला अशाच एका फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. आरोपींनी अटकेची भीती दाखवून महिलेकडून तब्बल 1 कोटी 69 लाख 98 हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.

सुरुवातीला एका अनोळखी फोन कॉलने झाली. महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून आक्षेपार्ह मजकूर पाठवण्यात आल्याची तक्रार असल्याचे फोन करणाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर एका व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून आपण मुंबई क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचा दावा केला. या व्यक्तीने आपले नाव ‘विजय खन्ना’ असल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
महिलेचा कथितपणे पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणाशी संबंध असल्याचे सांगत आरोपींनी त्यांना अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली. विश्वास बसावा यासाठी बनावट शिक्का असलेले अटक वॉरंटही दाखवण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला.

तपासाच्या नावाखाली महिलेच्या बँक खात्यातील पैसे एका विशिष्ट खात्यावर पाठवण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे मोठी रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.








