लोणी काळभोर, ता. 10: मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील मांजराई देवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घरकुल परिसरात दोन तरुणांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सुरज बाबू भंडारी (वय 35 ) यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अभिजीत शेंडगे, सिद्धांत आबा खुडे आणि इतरांविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या माहीतीनुसार, साहिल वंजारी (वय 19 ) आणि अभिजीत शेंडगे यांच्यात गुरुवारी (ता. 8 ) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात कारणावरून वाद सुरू होता. साहिलच्या घराच्या दरवाजावर मारहाण सुरू असल्याचे समजल्यानंतर सुरज भंडारी हे भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र, यावेळी अभिजीत शेंडगे, सिद्धांत खुडे आणि इतरांनी त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

याचदरम्यान अभिजीत शेंडगे याने हातातील लोखंडी हत्याराने सुरज यांच्या दिशेने वार केला. तो वार चुकवण्यासाठी सुरज यांनी डावा हात पुढे केला असता हत्याराचा वार त्यांच्या अंगठ्याला लागला. त्यामुळे अंगठ्यातून रक्तस्राव सुरू झाला. जखमी अवस्थेत सुरज यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा होऊ लागले.

‘कोण मध्ये येतो, त्याचा मुडदा पाडतो’ अशी धमकी?
तक्रारीनुसार, नागरिक जमा होत असल्याचे पाहून अभिजीत शेंडगे याने हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवत, ‘मी इथला भाई आहे. कोण याला सोडवायला येतो, त्याचा मुडदा पाडतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. भीतीपोटी काही रहिवाशांनी घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या. त्यानंतर संबंधित आरोपी हत्यारासह घटनास्थळावरून निघून गेले. जखमी सुरज भंडारी यांनी उपचारासाठी वरद हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. उपचार घेतल्यानंतर त्यांनी 9 ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मांजरी बुद्रुकमधील रहिवासी परिसरात झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून हत्यारांचा वापर आणि नागरिकांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही अपेक्षित असून, आरोपींविरुद्ध नेमकी कोणती कारवाई झाली आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.







