शिरुर, (पुणे) : पुण्यातील शिरूर मतदारसंघ गेल्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे. शिरुर मतदार संंघात महायुती सध्या कोण उमेदवार देणार हे अजून स्पष्ट झालं नाही. यासंदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर आज शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचं आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदार संघ गेली आठवडाभर चांगलाच चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेलं नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळं त्यांनी या मतदारसंघावर हक्क दाखवला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले आहेत.
त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत विचारणा झाली, तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कार्यकर्ते ही म्हणतायेत, की राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले