शिरूर : पुणे व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर कुकडी नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर श्री मळगंगा देवीचे मंदीर आहे. नदीवर असणारा झुलता पुलाच्या मार्गावरून या आदिमाया शक्तीच्या दर्शनाला भावीक व पर्यटक नवरात्र उत्सवात गर्दी करतात. आई उदो ग अंबाबाई च्या… जयघोषात या आदीमाया शक्तीच्या दर्शनाला राज्यातून तसेच पंचक्रोशीतून भावीकांची अलोट गर्दी होत आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी तर पारनेर तालुक्यातील निघोज या गावातील सरद्दीवर असणारे श्री मळगंगा देवीचे देवस्थान आहे. ग्रामस्थ व भावीकांच्या मदतीने येथील देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. कुकडी नदीच्या किनाऱ्यावर हे मंदिर असून या नदीत जगप्रसिद्ध रांजणखळगे बघायला मिळतात. नवरात्र उत्सवा दरम्यान या मंदिरात भजन, किर्तन, होमहवन नित्य नियमाने केले जाते. टाकळी हाजी व निघोज गावात देखील श्री मळगंगा देवीचे मंदिर आहे.
भौगोलिकदृष्टया या मंदिराचा परीसर निसर्गरम्य असून या नदित असणारे रांजणखळगे पहाण्यासाठी परदेशी पाहूण्याबरोबर राज्यातून पर्यटक येत असतात. कुलदैवत म्हणून श्री मळगंगा देवीला राज्यातून भावीक दर्शनासाठी गर्दी करतात. या देवीबाबत जुनी आख्यायीका येथील भक्त व ग्रामस्थ सांगत असतात. सध्या दररोज या देवीच्या दर्शनाला व आरतीला भावीक गर्दी करताना दिसत आहेत.
झुलत्या पुलावर सावधानतेने जा…
कुकडी नदीवर असणारा झुलता पुल यामुळे पुणे व नगरच्या भावीकांना श्री मळगंगा देवीचे दर्शन सहजतेने घेता येते. मात्र या पुलावर जास्त वेळ गर्दी करून किंवा सेल्फी काढताना नदीपात्रात पडण्याची भिती असते. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करताना कोणतीही गडबड न करता महिला, जेष्ठांना व मुलांना सवकाशतेने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.