उरुळी कांचन, (पुणे) : पुणे रेल्वे स्थानक परिसरात देवदर्शन घेऊन परतणाऱ्या खामगाव टेक (ता. हवेली) येथील 75 वर्षीय मंडाबाई बापू गडदे या वृद्ध महिलेला पुणे रेल्वे स्थानकावर एका भामट्या नवविवाहित दाम्पत्याने चहामध्ये गुंगीचे औषध पाजून त्यांच्या अंगावरील व कानातील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या आजींवर ससून रुग्णालयात तब्बल चार दिवस उपचार सुरू होते. उरुळी कांचन पोलीस आणि नातेवाईकांनी राबवलेल्या 50 तासांहून अधिकच्या अखंड शोधमोहिमेनंतर आजी सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी दर्शनासाठी गेलेल्या मंडाबाई गडदे या 30 जुलै रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. त्यांनी नातसून प्रणाली गडदे यांना फोन करून “मी उरुळी कांचनला येणाऱ्या ट्रेनने घरी येत आहे, मला घ्यायला या,” असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.
पुणे स्टेशनवर रेल्वेची वाट पाहत असताना एका नवविवाहित जोडप्याने आजींशी गोड बोलून गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यातील पुरुषाने आजींना चहा पिण्याचा आग्रह केला. आजींनी प्रथम नकार दिला, मात्रसोबतच्या महिलेने “तुम्हाला चहा प्यावाच लागेल,” असा हट्ट धरला. आजींनी चहाचा घोट घेताच चहात आधीच टाकलेल्या गुंगीच्या औषधामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या. आजी बेशुद्ध पडताच या भामट्या दाम्पत्याने त्यांच्या अंगावरील आणि कानातील सोन्याचे दागिने काढून पोबारा केला.
स्थानकावर बेशुद्ध पडलेल्या आजींना पाहून काही तरुणांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. चहातील औषधाची तीव्रता अत्यंत जास्त असल्याने आजी तब्बल तीन दिवस अर्धबेशुद्ध अवस्थेत होत्या. गुरुवारी (ता. 30) सायंकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना पूर्ण शुद्ध आली. डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक उपचार करून दोन दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना दोनशे रुपये देऊन दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोडले.
इकडे मंडाबाई बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि उरुळी कांचन पोलीस शोध घेत होते. नातू तेजस गडदे पुणे स्टेशन परिसरात शोध घेत असताना एका प्रत्यक्षदर्शी महिलेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार तेजस यांनी ससून रुग्णालयात रविवारी दुपारी तीन वाजता धाव घेतली असता, आजींवर उपचार करून त्यांना सोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आजी ससूनमधून बाहेर पडल्याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब बस स्टॉप, पीएमपीएमएल बस स्थानक आणि उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात येऊन थांबले. ससूनमधून निघाल्यानंतर आजी पीएमपीएमएल बसने हडपसर येथे आल्या, तिथून हडपसर रेल्वे स्थानक गाठून रात्री 9 वाजता त्या उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर सुखरूप पोहोचल्या. तिथे ताटकळत असलेल्या कुटुंबीयांनी त्यांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला.
दरम्यान, या वृद्ध महिलेचा जीव वाचवून त्यांना सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन करण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश विधाते, सहायक पोलीस निरीक्षक पवार, उत्कर्षा जाधव, पोलीस हवालदार निलेश जाधव, उद्धव गायकवाड, विकास लगस, गाडेकर तसेच कुटुंबीय तेजस गडदे, आकाश शेंडगे, तुकाराम शेंडगे, कैलास शिंदे, संजू गडदे, अक्षय थोरात व चव्हाण या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी मेहनत घेतली.






