पुणे, ता. २४ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल व्यसनमुक्ती अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हा सत्कार महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री तथा पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. व्यसनमुक्ती क्षेत्रात डॉ. गिते यांनी केलेल्या दीर्घकालीन, प्रभावी आणि समाजहितकारी कार्याची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिते यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती, युवक प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने काम केले आहे. राज्यभरातील हजारो युवक, पालक आणि नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचवून त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार” प्रदान केला होता. हा राज्यस्तरीय सन्मान संजय शिरसाटयांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक बळ आणि प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
डॉ. गिते यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त असून सामाजिक कार्याशी संबंधित अनेक जागतिक विक्रम त्यांच्या नावावर नोंदवले गेले आहेत. राज्यपालांसह विविध सामाजिक संस्था, मान्यवर आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचे प्रशंसापत्रे व शिफारसपत्रांच्या माध्यमातून कौतुक केले आहे. तसेच त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी डॉ. गिते यांच्या व्यसनमुक्ती चळवळीतील समर्पित कार्याचे कौतुक करत, समाजात व्यसनमुक्त, सुसंस्कारित आणि सशक्त पिढी घडविण्यासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे जावे, अशा शुभेच्छा दिल्या.







