पुणे : शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका महिलेला बेळगाव येथून अटक केली आहे. राजश्री राजेश तुडयेकर (वय 42) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शिवाजीनगर परिसरात ‘रॉयल फॉरेक्स ट्रेडिंग’ नावाने कार्यालय सुरू केले होते. या माध्यमातून गुंतवणूकदारांशी संपर्क साधून त्यांना शेअर बाजार आणि परकीय चलनातील ट्रेडिंगबाबत माहिती देण्यात येत होती. कमी कालावधीत मोठा परतावा मिळेल, असे सांगून लोकांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

गुंतवणुकीसाठी 1 लाख रुपयांपासून मोठ्या रकमेपर्यंत विविध योजना सांगितल्या जात होत्या. अधिक पैसे गुंतवल्यास त्याप्रमाणे मोठा नफा मिळेल, असे आश्वासन दिल्याने काही गुंतवणूकदार तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पैसे देत गेले.

काही काळानंतर गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा मिळत नसल्याचे लक्षात आले. पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित महिलेशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर या व्यवहारांबाबत संशय निर्माण झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
तक्रार मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी महिला बेळगावमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले. या प्रकरणात फसवणुकीची रक्कम मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आणखी किती लोक या प्रकरणात अडकले आहेत आणि एकूण किती रकमेचा व्यवहार झाला , याचा तपास सुरू आहे.







