शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात परप्रांतीय युवकाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मोहताब शाहिद आलम (वय.२६, रा. बिहार, सध्या रा. भैरवनाथ बिल्डिंग बाबूरावनगर, शिरूर) असं मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद समिद मासूम यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परप्रांतीय मृत युवक मोहताब हा मोहम्मद याचा चुलत भाऊ आहे. रविवारी रात्री जेवण झाल्यानतर वेगवेगळ्या खोलीत हे दोघेही झोपले होते. सकाळी मोहम्मद याला जाग आल्यानंतर खोलीची कडी बाहेरून लावल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तसेच मोहताबचा फोनही बंद असल्याने त्याने दुसरा चुलत भाऊ सोयल शरीफ मन्सूरी याला फोन करून बोलावून घेतले.
त्यानंतर दोघांनीही मोहताब यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता, त्याचा गळा चिरला असल्याचे आणि मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.