पुणे : पुरंदर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्या जोरावर शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भात लावणे केली. पिकांची वाढ ही चांगली झाली होती. चांगली उत्पादनही मिळेल अशी अपेक्षा असताना तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळातून सावरत असताना पुन्हा आमच्यावर संकट कोसळल्याची भावना पुरंदरच्या पश्चिम भागातील सामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे .पुरंदर तालुक्यातील नारायणपूर, भिवडी, गराडे, कोडीत येथील ओढे नाले पावसामुळे चांगलेच वाहू लागले आहेत. त्यामुळे सासवडमध्ये करा नदीला मोठा पूर आला आहे. अनेकांची पिके पाण्याखाली गेली.
भिवडी, नारायणपूर येथे भात खाचरे वाहू लागली. जोरदार पावसामुळे भात, भुईमूग, वाटाणा, घेवडा, सोयाबीन, मेथी तसेच फळबागांचेही भरपूर प्रमाणात नुकसान झाले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी सरकारने किमान मदतीचा हात तरी पुढे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांनी उसनवारी पैसे घेऊन पेरण्या केल्या होत्या. परंतु त्यावरील खर्च पावसामुळे वाया गेल्यात जमा झालेला दिसत आहे. कोडीत परिसरात झालेल्या जोरदार पावसाने वाटाणा, घेवडा, भुईमुगांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. शेतात पाणी साचल्याने पिके कुजू लागल्याचे वाटाणा उत्पादक कोडीत आले आहेत. शेतकरी ईश्वर बडदे यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.