शिरुर : शिरुर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणात खेळत असणाऱ्या एका ४ वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात काल शुक्रवारी (ता. १८) रात्रीच्या सुमारास घडली आहे. वंश राजकुमार सिंग, असं मृत मुलाचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षीय चिमुकला वंश हा रात्री अंगणात खेळत होता. त्याचे आई-वडील घरकामात व्यस्त होते. यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरड होताच चिमुकल्याच्या मानगुटीला पकडून बिबट्याने जवळच्या ऊसाच्या शेतात पळून गेला. नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता, बिबट्याने चिमुकल्याला सोडून दिले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या वंशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसापासुन पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनपरिक्षेत्रात बिबट्याची मोठी दहशत असल्याचे दिसून येत आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाळीव प्राण्यांसह माणसांवरील दिवसाढवळ्या बिबट्या हल्ले करीत आहे. तसेच रात्रीच्या वेळी बिबट्यांची टोळकी शिकारीसाठी थेट लोकवस्तीत सुद्धा येऊ लागली आहेत.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. अनेकजण बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी वनविभाग अपयशी ठरत असल्याने नागरिकांसह पाळीव प्राण्यांचे देखील जीव जात आहेत. या घटनेवरुन नागरिकांनी वनविभागाविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला आहे.