दौंड : दौंड तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. पाटसचा किरण पवार हा 30 वर्षांचा मेहनती तरुण, परिस्थितीशी दोन हात करत, धडपडत नवं काही तरी उभारू पाहत असणारा होतकरू मुलगा होता. तो नसरापूर जवळच्या एका हॉटेलमध्ये कामाला होता. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, त्यात वडिलांना झालेला पॅरलेसिस, आई जसा होईल तसा आपला संसार हाकत असते. किरण आपल्या कष्टाच्या बळावर ही सारी परिस्थिती सावरण्याचा अतोनात प्रयत्न करत होता. परंतु नियतीला काही वेगळं मंजूर होतं.
गुरुवार २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी खेड शिवापूर रोडवर त्याचा भीषण अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. धाकटा भाऊ आर्थिकतेने हतबल झाला होता, त्याने कर्ज काढून उपचारासाठी 4 लाख उभे केले होते. परंतु उपयोग झाला नाही. काल शुक्रवारी किरणने आपला अखेरचा श्वास घेतला.
किरणच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता तर दुसरीकडे हॉस्पिटलने नातेवाईकांच्या हातात बाकी राहिलेल्या 4 लाख 27 हजार बिलाचा कागद ठेवला. ‘आधी बिल भरा आणि नंतर डेडबॉडी घेऊन जा’ असं सांगण्यात आलं होतं. किरणच्या कुटुंबाची परिस्थीती नाजूक असल्याने राहिलेले पैसे ते कसे भरणार? हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु तेवढ्यात मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे याना एक कॉल जातो. सर्व हकीकत सांगितली जाते.
परिस्थितीची माहिती होताच, मंगेश चिवटे यांच्याकडून सर्व सूत्रे ताबोडतोब हलवली जातात. तेवढ्यात चिवटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार आरोग्यसेवक अजय सकपाळ रुग्णालयात येतात आणि आपल्या कडक शद्बात सांगता की ‘त्यांचा एक रुपयाही बिल घेऊ नका आणि पाच मिनिटांच्या आतमध्ये डेडबॉडी नातेवाईकांच्या ताब्यात द्या!’ या एकाच वाक्यावर हॉस्पिटल प्रशासन दणाणून जातं. मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने हॉस्पिटलचे पूर्ण बिल माफ केलं जातं. किरणच्या कुटूंबासाठी किरण जाणं हे दुःखद असलं तरी समोर भला मोठा पैशांचा डोंगर भरणं कुटूंबाला शक्य नसतो. तेव्हा मंगेश चिवटे किरणच्या कुटुंबासाठी देवदूत म्हणून उभे ठाकतात.
मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे अशा बिकट परिस्थितीमध्ये अनेकांसाठी देवदूत ठरले आहेत. किरणच्या कुटूंबाला केलेली मदत हा त्याचाच एक भाग आहे. त्यांचं समाजाप्रती असलेलं प्रेम आणि आपुलकी या प्रसंगातून अधोरेखित होते. दरम्यान, काल रात्री 9 च्या दरम्यान किरणचा अंत्यविधी करण्यात आला.