लोणी काळभोर : खडकवासला पाटबंधारे विभागाने शेतीसाठी (Haveli News) भाडेपट्ट्याने दिलेल्या पर्यायी रस्त्याचा गैरवापर होत आहे. या रस्त्याचा वापर अनधिकृत प्लॉटिंग चालकांनी प्लॉटिंगसाठी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाटबंधारे विभागाच्या भूमिकेमुळे अनधिकृत प्लॉटिंग चालकांची मुजोरी वाढली असून त्यांनी चक्क शेतकऱ्यांची तब्बल अर्धा एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हा गंभीर प्रकार (Pune News) कुंजीरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडला असून याबाबत शेतकऱ्यांने प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. (Latest Marathi News)

प्रकाश दत्तात्रय घुले, नवनाथ चंद्रकांत कुंजीर, नितीन अरुण घुले, लीलाबाई अरुण घुले, शंकर दत्तात्रय घुले (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी प्रशासनाकडे तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 806, 807/1,807/2, 807/3,811,815,917,810 मध्ये त्यांच्या मालकीची जमीन आहेत. तर या गटातून दक्षिण उत्तर सरकारी पाट गेला असून त्याचा गट क्रमांक 809 असून त्याचे क्षेत्र 23 गुंठे इतके आहे. या पाटाला बारा फाटा असे संबोधले जात असून कुंजीरवाडीच्या कॅनॉल मधून थेऊरच्या दिशेकडे पाणी या पाटाद्वारे जाते.
दरम्यान, खडकवासला पाटबंधारे विभागाने घनशाम ज्ञानोबा कुंजीर व इतरांना कुंजीरवाडी येथील जमिनीत जाण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने जुना मुठा उजवा कालवा फाटा क्र. 12 च्या साखळी क्रमांक 0/485 ते 0/935 मीटर वरील सेवापथ वापरण्यास परवानगी दिली आहे. विभागीय कार्यालयाने हा रस्ता अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिवर्षी प्रती किमी 15 हजार रुपये प्रमाणे भाडेपट्ट्याने दिला आहे. पाटबंधारे विभागाने भाडेतत्वावर दिलेल्या रस्त्याचा वापर प्रत्यक्षात अनधिकृत प्लॉटिंगसाठी होत असल्याचे दिसून आले आहे.
अनधिकृत प्लॉटिंग चालकांनी पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गट क्रमांक 808/3, 914,916/2 व 811/1 या चार गटांमध्ये प्लॉटिंग व्यवसाय थाटला आहे. पाटबंधारे विभागाने हा रस्ता भाडेतत्वावर देताना कोणतीही शासकीय मोजणी केलेली नाही. तसेच हद्दीखुणा कायम न करताच, प्लॉटिंगसाठी हा रस्ता भाडेतत्वावर कागदोपत्री दिला आहे. हद्दीखुणा न दिल्याने शेतकरी व अनधिकृत प्लॉटिंग चालकांमध्ये वाद सुरु झाला आहे. आर्थिक हितसंबंधापोटी पाटबंधारे विभागाचे काही अधिकारी प्लॉटिंग चालकांसाठी नियमांची पायमल्ली करून काम करू लागले आहेत.
शेतकऱ्यांची अर्धा एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न
प्रकाश घुले, नवनाथ कुंजीर, नितीन घुले, लीलाबाई घुले, शंकर घुले या शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी 12 फुटी रस्ता त्यांच्या मालकी जागेतून तयार केला आहे. या शेतकऱ्यांच्या शेतामधून पाट गेला आहे. परंतु, पाटबंधारे विभागाने सरकारी पाटाची शासकीय मोजणी न करताच, शेतकऱ्यांच्या स्वमालकी रस्त्यातूनच प्लॉटिंगसाठी रस्ता देण्याचा घाट बांधला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्धा एकर क्षेत्र धोक्यात आले आहे.
कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 809 मध्ये पाटबंधारे विभागाचे 23 गुंठे क्षेत्र आहे. पाटबंधारे विभागाने या क्षेत्रातील रस्ता काही जणांना भाडेतत्वावर दिला आहे. हा रस्ता शेतकऱ्यांना वापरण्यासाठी दिलेला आहे. हा रस्ता अनधिकृत प्लॉटिंगसाठी दिलेला नाही. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या अर्जाद्वारे द्या. वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवितो.
-मोहन बदाने (उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग खडकवासला)
जुना मुठा उजवा कालवा फाटा क्र. 12 च्यालगत आमचे क्षेत्र आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वखर्चाने स्वमालकीच्या जमिनीमधून येण्या-जाण्यासाठी कालव्यालगत रस्ता केलेला आहे. परंतु, पाटबंधारे विभागाने अवैध प्लॉटिंगसाठी भाडेतत्वावर रस्ता दिलेला आहे. यामध्ये अधिकाऱ्यांनी मलीद्यासाठी शासकीय नियमांना केराची टोपली दाखवली आहे. प्लॉटिंग चालकांनी थेट आमच्या मालकी हक्काच्या रस्त्यावरच कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने त्याच्या जागेच्या हद्द्खुणा कायम कराव्यात. तसेच नियमानुसार अवैध प्लॉटिंग चालकांना रस्ता देता येत असेल तर त्यांनी त्यांच्याच जागेतून द्यावा.
-गोरख घुले (शेतकरी-कुंजीरवाडी, ता. हवेली)






