लोणी काळभोर, ता. 7 : चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे आणावेत, तसेच लग्नातील सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी द्यावेत, अशी मागणी करत पतीने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप हडपसरमधील 32 वर्षीय सहाय्यक प्राध्यापिकेने केला आहे. तसेच पतीसह सासरच्या मंडळींनी घरात बैठक घेऊन घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी धमकी दिल्याची तक्रार महिलेने हडपसर पोलिसांकडे केली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या जबाबानुसार, महिलेचे प्रविण भगवान शेंडे याच्याशी १४ ऑगस्ट २०२५ रोजी आळंदी येथे विवाह झाला. महिलेचे एम.ई.पर्यंत शिक्षण झाले असून ती हांडेवाडी रोड येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करते. लग्नानंतर काही दिवस पतीच्या मूळ गावी राहिल्यानंतर दोघे पुण्यात आले.

पुण्यात आल्यानंतर काही दिवसांनी पतीने ‘तुझ्याकडील सोन्याचे दागिने माझ्या ताब्यात दे, ते गहाण ठेवायचे आहेत; नाहीतर माहेरून पैसे आण, मला चारचाकी घ्यायची आहे,’ असा तगादा लावल्याचे महिलेने सांगितले. पैसे व दागिने देण्यास नकार दिल्यानंतर पतीकडून शिवीगाळ व मारहाण सुरू झाल्याचा आरोप आहे. तसेच पतीचे कुटुंबीयही फोनवरून शिवीगाळ करून मानसिक त्रास देत असल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकारानंतर ३१ मे २०२६ रोजी महिलेच्या घरी कौटुंबिक बैठक झाली. बैठकीत पतीने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सासू व नणंदेने तिच्या अंगावरील दागिने परत मागितले. दरम्यान, पतीचा भाऊ व दाजी यांनी वकिलाशी फोनवर चर्चा केल्यानंतर पती घटस्फोटाची कागदपत्रे घेऊन आला.

दरम्यान, ३१ मे रोजीच्या बैठकीत दीर प्रशांत भगवान शेंडे, सासू भाग्यश्री भगवान शेंडे, नणंद वर्षा दत्तात्रय बोराटे, शुभांगी अशिष फुलसुंदर, दत्तात्रय तुकाराम बोराटे आणि अशिष फुलसुंदर यांनी घटस्फोटाच्या कागदांवर धमकी देऊन सही करण्यास भाग पाडल्याचा आरोप महिलेने केला आहे. दोन दिवसांनी पतीने कोर्टात सही करण्यासाठी बोलावले; मात्र संसार टिकवण्याच्या इच्छेने ती गेली नाही. या प्रकरणी पती प्रविण शेंडे, सासू, दीर, दोन नणंदा व दोन दाजी अशा सहा जणांविरुद्ध महिलेने तक्रार दिली असून, हडपसर पोलिसांनी जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.







