पुणे: पुण्यात पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. विमाननगर ते वाघोलीदरम्यान प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने हा प्रकार घडत असताना कोणाच्याही लक्षात आला नाही. काही वेळानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात ही बाब आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील उबाळेनगर परिसरात राहतात. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता ते विमाननगर येथून वाघोलीच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये चढले. सायंकाळची वेळ असल्याने बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. प्रवासादरम्यान बसमध्ये धक्काबुक्कीही सुरू होती.

याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी अलगद काढून घेतल्याचा आरोप आहे. प्रवास सुरू असताना काही वेळाने ज्येष्ठ नागरिकांनी गळ्याला हात लावला असता सोनसाखळी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसमध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.

सोनसाखळी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी तातडीने विमानतळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बसच्या मार्गावरील आणि संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्यात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी आणि दागिने चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गर्दीच्या वेळी मौल्यवान दागिने, रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू सुरक्षित ठेवण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.







