उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहराजवळ चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येपूर्वी पतीने पत्नीचा व्हिडिओ तयार करून तिच्याकडून अनैतिक संबंध असल्याची कबुली घेतल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ त्याने नातेवाईकांसह इतरांना शेअर केल्याचेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर पत्नीवर हल्ला करतानाही त्याने व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर आली आहे. हत्या केल्यानंतर ‘शिक्षा दिली’ अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचाही दावा करण्यात आला आहे.

कळंब शहराजवळील हासेगाव (केज) परिसरात ही घटना घडली. गणेश शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावरगाव, कळंब) असे संशयित पतीचे नाव असून, मृत महिलेचे नाव कोमल असल्याचे समोर आले आहे. गणेश हा इंजिनिअर असून सध्या बेरोजगार असल्याने तो पुनर्वसन सावरगाव येथे राहत होता. मागील काही दिवसांपासून तो व्यसनाच्या आहारी गेल्याची चर्चा परिसरात असल्याचेही सांगितले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गणेश आणि कोमल यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर सायंकाळी सुमारे सहा वाजता गणेशने कोमलला दुचाकीवर बसवून कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव (के) परिसरातील ज्वारीच्या शेतात नेले. तेथे तिला मारहाण केल्यानंतर दगडाने हल्ला करून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार कोमल आणि गणेश यांच्या चार वर्षांच्या मुलासमोर घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर गणेश घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, हत्येमागील नेमके कारण, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.






