लोणावळा : पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा-खंडाळा परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. पोलिसांनी 148 ग्रॅम कोकेन जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 74 लाख असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात सोनू सीताराम उपाध्याय (वय 28, रा. डेरिवली, पनवेल, जि. रायगड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना खंडाळा परिसरात एक व्यक्ती महागडा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून पथकाने मंगळवारी रात्रीपासून बुधवारी मध्यरात्रीपर्यंत केरावाला सोसायटी ते रेल्वे गेट क्रमांक 30 या परिसरात लक्ष ठेवले.

संशयित व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे कोकेन असल्याचे आढळले. पोलिसांनी 148 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 74 लाख असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईनंतर लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संतोष कांतिलाल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, जप्त करण्यात आलेले कोकेन नेमके कुठून आणण्यात आले होते, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. तसेच लोणावळा आणि खंडाळा परिसरात ते कोणाला देण्यात येणार होते, याचीही माहिती तपासातून मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकरणाच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या विक्रीचे आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे पोलिसांचे लक्ष आहे. आरोपीच्या संपर्कातील व्यक्ती तसेच या व्यवहारामागील संपूर्ण साखळीची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.







