आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर शहरातील बशीरभाई मळा परिसरातील एका व्यावसायिक आस्थापनावर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुगंधीत तंबाखू व प्रतिबंधित पानमसाला सुमारे 2 लाख 41 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इम्रान हुसेन शेख (वय 38, रा.40 फुटी रोड, बाजारतळ नगरपालिका इमारतीच्या मागे, इंदापूर), यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये शुक्रवारी (दि.19) जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने इंदापूर शहरातील मौजे इंदापूर येथील गट क्रमांक 216/12/अ, एबीएस शॉपिंग कॉर्नर, गाळा क्रमांक 6, बशीरभाई मळा परिसरात तपासणी केली.त्यावेळी तपासणीदरम्यान पानमसाल्याच्या पिशव्या व पाऊच उघडून पाहणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखू आढळून आली. संबंधित साठ्यातून विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले असून उर्वरित साठा मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने पुनर्विक्री अथवा पुनर्वापर होऊ नये यासाठी एकूण 2 लाख 41 हजार 140 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित माल बाजारातून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र, पुरवठादाराची कोणतीही माहिती देऊ शकला नाही. तसेच खरेदीची कोणतीही अधिकृत बिले किंवा कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.







