लोणी काळभोर : नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता याव्यात. त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा आणि तक्रारदारांची गैरसोय न होता, त्यांच्या तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आज शनिवारी (ता.१३) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आलेल्या दोन्ही पक्षकारांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. यावेळी प्राप्त झालेल्या १७ तक्रार अर्जाचा निपटारा करण्यात आला. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, गोपनीय अंमलदार रामदास मेमाणे, महिला पोलीस हवालदार ज्योती नवले, पोलीस अंमलदार संदीप धुमाळ, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींच्या कार्यवाहीची माहिती वरिष्ठांना व तक्रारदारास दिली जाणार आहे. समोर आलेल्या अर्जानुसार तडजोडी आणि समझोता प्रयत्नही होणार आहे. अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न यादरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आजपासून तक्रार निवारण दिन सुरु करण्यात आला आहे. या दिनाचे पहिल्यांदाच आयोजन केल्याचे असतानादेखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. येथून पुढे दर शनिवारी या दिनाचे आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने हा दिन सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाणे अथवा पोलीस चौकीच्या ठिकाणी आपल्या तक्रारी मांडाव्यात व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सोडवाव्यात. असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.