राजेंद्रकुमार शेळके
पुणे : पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांचे उचित स्मारक होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ढसाळ यांच्या जन्मगावी पूर (ता. खेड) येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
विश्व साहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ साहित्य संमेलन त्यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर महाराष्ट्र राज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने कनेरसर येथे कुलस्वामीनी सभागृहात नुकतेच झाले. या वेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तसेच पद्मश्री नामदेव ढसाळ व कामगार नेते मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष दादासाहेब गावडे, उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस, उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, खासदार शिवाजीराव आढळराव, स्वागताध्यक्ष अशोक तावरे, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅंथर सुखदेव सोनवणे, प्रा. राजेंद्र सोनवणे, निमंत्रक शुभम सोनवणे, अॅड. जयदेव गायकवाड, भगवान पोखरकर, अॅड. विजयसिंह शिंदे, अॅड. प्रकाश शितोळे, कवी म. भा. चव्हाण, सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे, संयोजन समिती अध्यक्ष दिलीपराव माशेरे व साहित्यप्रेमी उपस्थित होते. श्रीकांत चौगुले, सुनीताराजे पवार, वि. दा. पिंगळे, डॉ. सुरेश वाकचौरे, सुनिल थिगळे, काळुराम घोडके, मिलींद इंगळे, रमेश गोडसे, शांताराम पाटोळे, सरपंच अश्विनी साबळे, भाग्यश्री चव्हाण, सुनिता केदारी, दौलतराव सोनवणे, कृष्णराव ढसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, “पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभवसंपन्न तालुका म्हणजे खेड तालुका होय. हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनित झालेल्या, संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने फुललेल्या महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यामाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, मायभुमीमध्ये सर्वसामान्य दलित कुटुंबामध्ये साहित्यरत्न पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा जन्म पूर कनेरसर या छोट्याशा गावात झाला. ढसाळ यांनी खेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष म्हणून प्रयत्नवादी होवून अन्याय, अत्याचार, दादागिरी, विषमता नष्ट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. दलित बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला. कवी, लेखक, साहित्यिक म्हणून त्यांना जगात प्रसिद्धी मिळाली.
पॅंथर नामदेव ढसाळ यांच्या जन्मगावी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. सन्माननीय अतिथी म्हणून शंभुराजे देसाई लाभले. संमेलनाध्यक्ष साहित्यिक दादाभाऊ गावडे होते. संयोजक, स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे होते. साहित्य दिंडीत साहित्यिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक केले. कनेरसर येथील थोर सुपुत्रांचा वारसा जतन करण्यासाठी संमेलन आयोजित करून अभिवादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी नामदेव ढसाळ यांच्या स्मृती जागविल्या. साहित्य संमेलन ही नामदेवराव ढसाळांच्या विचाराचा वारसा जतन करण्यासाठी असल्याचे सांगितले. या वेळी साहित्यिक ॲड. प्रकाश शितोळे, पत्रकार इसाक मुलाणी, सुनिल थिगळे, काळुराम घोडके, उद्योजक मिलिंद पिंगळे, रमेश गोडसे, शांताराम पाटोळे, सरपंच अश्विनी साबळे, भाग्यश्री चव्हाण, सुनीता केदारी, दौलतराव सोनवणे, पूर गावचे सुपूत्र कृष्णराव ढसाळ आदी मान्यवरांना नामदेवराव ढसाळ स्मृती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी नामदेवराव ढसाळांचे साहित्य क्षेत्रातील योगदान व ग्रामीण साहित्य चळवळीचे वास्तव या विषयावर परिसंवाद झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य कार्यवाह सुनीताराजे पवार, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, वि. दा. पिंगळे. डॉ. सुरेश वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. निमंत्रक शुभम सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी नामदेव ढसाळ यांच्या विचारधारेला वाहणारी सामाजिक परिवर्तन काव्यमैफल संपन्न झाली. अनेक कवी-कवयित्रींनी काव्यवाचन करुन मैफलीत रंगत भरली. उत्तम कवितांना बक्षिस देण्यात आले. सहभागींना सन्मानपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे, अस्मिता मराठे यांनी केले.