यवत : यवत गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्ताने यवत येथे सप्ताह सुरू असून, सप्ताहाचे हे ५६ वे वर्ष आहे. रात्री श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा होणार आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त मंगळवारी सायंकाळी चार वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर येथून भव्य दिंडी सोहळा सुरू झाला.
ज्ञानोबा-माऊली-तुकाराम, माऊली व हरिनामाच्या गजरात यवत गावातून ग्राम प्रदक्षिणा करत श्री काळभैरवनाथांची पालखी व भव्य दिंडी सोहळा यवत काळभैरवनाथ मंदिरात येथे दाखल झाला. यावेळी विद्या विकास मंदिर शाळेचे अनेक विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ वारकरी व महिला भगिनी व बालगोपाल मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दिंडी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. जणू काही पालखीचे आषाढी वारीचे स्वरूप यवत गावाला प्राप्त झाले होते. अखंड हरिनामाच्या गजरात पालखीचे मंदिरात आगमन झाल्यानंतर अनेकांनी हरिनामाच्या व राधाकृष्ण राधा गजरात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
यानंतर हरिपाठ होऊन श्री काळभैरवनाथ महाराजांची आरती करण्यात आली. रात्री ह. भ. प. माधव महाराज राऊत (बीड) यांचे श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव कीर्तन संपन्न होणार आहे