पुणे : गेल्या 4 महिन्यांपासून चातुर्मास सुरू असल्याने विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभकार्ये टाळली जात होती. मात्र आता चातुर्मासाची सांगता जवळ आली असून पुन्हा एकदा शुभकार्यांचे मुहूर्त सुरू होणार आहेत. हिंदू धर्मात कार्तिकी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवसाला देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. त्यामुळे या दिवसापासून शुभकार्यांना सुरुवात केली जाते.

यंदा कार्तिकी एकादशी दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्र पंचांगानुसार, शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी स्मार्त कार्तिकी एकादशी आहे. तर वारकरी संप्रदायानुसार शनिवार, 21 नोव्हेंबर 2026 रोजी भागवत एकादशी साजरी होणार असून याच दिवशी पंढरपूरची मुख्य कार्तिकी वारीही पार पडणार आहे.
पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णू आणि शंखासुर राक्षस यांच्यात मोठे युद्ध झाले होते. या युद्धात शंखासुराचा वध केल्यानंतर भगवान विष्णू योगनिद्रेत गेले. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशीला ते निद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. देवउठनी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजनही केले जाते. चातुर्मासात विवाह आणि इतर शुभकार्ये टाळण्याची परंपरा आहे. भगवान विष्णू जागे झाल्यानंतर शुभकार्यांना पुन्हा सुरुवात होते, अशी मान्यता आहे.








