संतोष पवार
पुणे : सध्या पावसामुळे उजनी धरणाचे यशवंत जलाशय काठोकाठ भरलेले असल्याने जलाशयावर गुजराण करणाऱ्या जलचरांसह विविध प्रजातीच्या देशी विदेशी पक्ष्यांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. उजनी जलाशयात कारखानदारी व औद्योगिक क्षेत्रांतील भागातून बाहेर पडणारे दूषित पदार्थ रासायनिक पाणी तसेच शहरी भागातील सांडपाणी केरकचरा, रसायने आदि उजनीच्या पाण्यात मिसळत असल्याने पाणी प्रदुषणाच्या पातळीत वाढ होत असते. तथापि गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उजनी धरण अवघे साठ टक्क्यांपर्यंतच भरले होते . गरजेनुसार धरणातील कमाल क्षमतेने पाणी उचलल्याने धरणाच्या पाण्याची पातळी मायनसमध्ये गेली होती. पाणीसाठा खालावल्याने पूर्णपणे दुषित पाण्याचा वापर झालेला दिसून येत आहे.
घाटमाथ्यावर झालेला पाऊस व धरणक्षेत्रातील संततधार यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे अर्थातच हे पाणी स्वच्छ नितळ व निर्मळ असणार आहे. प्रदूषणविरहित असणारे जलाशयातील पाणी हे विविध जलचर मासे, सरीसृप पशुपक्षी-प्राणी यांच्यासाठी पोषक असेल असे निसर्ग अभ्यासकांचे मत आहे.
स्थानिक पक्ष्यांबरोबर विविध प्रजातींच्या विदेशी पक्ष्यांसाठी पंढरी असलेल्या उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात हजारों देशी विदेशी पक्षी उदरनिर्वाहासाठी येत असतात. वातावरणातील बदलाला अतिशय संवेदनशील असलेले पक्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गर्दी करतील. त्यामुळे निसर्गप्रेमी, पक्षीअभ्यासकांना पक्षीनिरीक्षणाची नामी संधी मिळेल. अशी माहिती पक्षीनिरीक्षक व पर्यावरण अभ्यासकांकडुन मिळत आहे.