इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारताने आपली योग साधनाची देणगी जगाला दिली असल्याचे म्हटले.
21 जून हा जागतिक योग दिन म्हणून देशात व जगात साजरा करण्यात येतो. यावेळी इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक नागरिक यांनी योगामध्ये सहभागी होऊन, योग दिन साजरा केला. इंदापूर पतंजलीचे प्रमुख दत्तात्रय अनपट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग साधनेचे प्रशिक्षण दिले. तसेच यावेळी साक्षी चोपडे या विद्यार्थिनींने विविध रिदमिक योगांची आसने सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी योग शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ भारताने संपूर्ण जगाला योग साधनेची देणगी दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योगसाधना संपूर्ण जगभर पोहोचवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज योग साधना करतात. योगामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. आनंदी जगण्यासाठी योग हा महत्त्वाचा आहे. नवीन पिढीला तंदुरुस्त राहण्यासाठी योग शिक्षण महत्त्वाचे आहे. मुलांच्या सर्वांगीण शारीरिक, बौद्धिक विकासासाठी योगाला महत्त्व असून आपण नित्यनेमाने योग साधना करावी.
इंदापूर शहरामध्ये सर्वात मोठे असे योग भवन उभारले जात आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पतंजली योग समिती गेली 18 वर्ष योग साधनाचे कार्य करत आहे. अनेक योगशिक्षक शाळा, गावामध्ये या योगाच्या माध्यमातून योग साधनेचे प्रशिक्षण देत आहेत. इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, माजी नगरसेवक शेखर पाटील,शिवाजी शिंदे , रघुनाथ राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार प्रा. बापू घोगरे यांनी मानले.