यवत : यवत येथील श्री तुकाई मातेचे शारदीय नवरात्र महोत्सवाची नवव्या माळेस घटोत्थापनेने सांगता झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी (तुकाई माता, यवत) शारदीय नवरात्र महोत्सवाची नवव्या माळेस घटोत्थापनेने सांगता झाली. पहाटे समस्त अवचट परिवाराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुकाई मातेची नित्य पूजा करण्यात आली. सायंकाळी ७ च्या सुमारास वेदमूर्ती दिवाकर गोरे गुरुजी यांच्या मंत्रोपचाराने श्री तूकाई माता मंदिर येथे नवरात्री महायज्ञ संपन्न झाले.
आई राजा उदो उदोच्या गजरात खंडेनवमीनिमित्त मंदिरातील होमकुंडावर पारंपारिक पद्धतीने धार्मिक विधी पार पडला. यावेळी यवत, केडगाव येथील संपूर्ण अवचट परिवार यांच्यासह भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती यानंतर श्री तुकाई मातेची आरती होऊन आई राजा उदो उदोच्या गजरात मंदिरातील गाभाऱ्यातील घटाचे उत्थापन करण्यात आले. तुकाई मंदीरातील घटोत्थापन झाल्यानंतर सकाळी १० च्या सुमारास श्री काळभैरवनाथ मंदिरातील जोगेश्वरीदेवी सह श्री महालक्ष्मी माता, श्री कळकाई माता, श्री काळुबाई आदी मंदिरातील घटोत्थापन पार पडले यानंतर घरोघरी प्रतिष्ठापित घट उठविण्यात आले. देवीस नैवद्य दाखविण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी श्री काळभैरवनाथ मंदिरातील मानाच्या पालखीतून प्रदक्षिणा करत सीमोल्लंघन होणार आहे.