सासवड (पुणे) : पुणे येथील पत्रकार भवनात रंगत संगत प्रतिष्ठान तसेच करम प्रतिष्ठानच्या वतीने गजलकारा वैशाली माळी यांना नुकताच ‘गजल प्रतिभा’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरुपातील हा पुरस्कार रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर व करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भुषण कटककर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. गजल या क्षेत्रांतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मीच माझ्या लिखाणाची पहिली समीक्षक असते. सुचलेले, रचलेले असे लिखाण एका पातळीवर आणत असते असे मनोगत व्यक्त करत वैशाली माळी यांनी या पुरस्काराने मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. अॅड प्रमोद आडकर यांनी माळी यांच्या गजल मनाला भावतात असे म्हणाले तर भुषण कटककर यांनी सुचलेले कल्पकतेने मांडणे हे माळी यांच्या गजलचे वैशिष्ट असल्याचे सांगितले.
सन्मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी केले तर सुत्र संचालन वैजयंती आपटे यांनी केले. पुरस्कारार्थीचा परिचय अपर्णा डोळे यांनी करून दिला. मैथिली आडकर व प्रज्ञा महाजन यांनी सर्वांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भुषण कटककर, प्रभा सोनवणे, सुजाता पवार, चंचल काळे, डॉ. मृदुला खैरनार (कुलकर्णी), शीला टाकळकर, वासंती वैद्य, सुधीर कुबेर, रेखा येळंबकर, समीर गायकवाड आदींच्या गजल रचनांचा सुरेख कार्यक्रम पार पडला.