अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : अहमदनगर-पुणे रस्त्यावरील शिरूर बायपास येथे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने अटक केली आहे. अविष्कार संजय सप्रे (वय-१९ वर्षे, सध्या रा. विठ्ठल नगर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. सावेडी, नागापुर एल.टी कॉलनी, ता, जि. अहमदनगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल निखील भिमाजी रावडे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निखील रावडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक तरुण त्याच्या पांढ-या रंगाच्या पोलो गाडीमध्ये गावठी पिस्टल सोबत घेवुन अहमदनगर ते पुणे रोडच्या लगत असणारे हॉटेल गंगा ग्रॅन्ड समोर थांबला आहे. याबाबत खात्री करून रावडे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना दिली.
त्यानंतर त्यांनी तातडीने शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, निखील रावडे, राजु मांगडे या तपास पथकाला देऊन त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने गंगा ग्रँड हॉटेल जवळ सापळा लावून आरोपी अविष्कार सप्रे याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याचे मॅगझिन मध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले असुन त्याबाबत कोणताही परवाना मिळुन आली नाही.
दरम्यान, त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व त्याचे मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतुस व मॅक्झिन जप्त करण्यात आले आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलिस हवालदार परशराम सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, पवन तायडे, राजु मांगडे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.